Made in India
निवडक केशवसुत
कवि केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)
श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत यांचा दि. ७ ऑक्टोबर १८६६ रोजी मालगुंड, जि.रत्नागिरी येथे जन्म झाला. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते.इंग्रजीतील कवितांतून दिसणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन केशवसुतांनी प्रथम मराठीत आणला. कवीची प्रतिभा स्वतंत्र असावी, कोणत्याही
प्रभावाशिवाय असे ते म्हणत. तिने याच प्रकारचे काव्य रचावे, असेच रचावे असे तिला आपण आदेश देऊ नयेत असे त्यांचे म्हणणे होते.
वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा
ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५
कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर
सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी
हाताळले आहेत. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे
बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी,
रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.
करा अपुल्या तू पहा चाचपून,
उरा अपुलिया पहा तपासून
प्रकृती माझीही तिथे तुज कळेल,
विकृती माझी तुज तिथे आढळेल.
किंवा आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते,
प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे,
डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.
अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले. मराठी कवितेच्या क्षेत्रात क्रांती घडवणार्या, कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल....
संग्रहीत
साभार : www.keshavsut.com
----------------------------------------------------
# केसवसुतांच्या काही निवडक कविता :
केसवसुतांच्या कविता ह्या www.keshavsut.com या संकेतस्थळावरून तसेच विकीपिडीया आणि गुगल अंतरजाळावरून घेतल्या आहेत...
१. खिडकीकडे मौज पहावयास
(वृत्त –उपजावी)
मजा पहायास विलोल बाला
सौधांवरी काञ्चनयुक्त जाला
तयीं त्वरेनें लगटून येती
राहोनि अन्य व्यवहार जाती
जाळीकडे एक जवें निघाली
कचांतली बन्धनमुक्त झालीं
पुष्पें, न बांधूं सुचलें तियेस
रोधी करें ती परि केशपाश
कोणी, सखी रंगवितां पदाला-
ओढून, ये तूर्ण पहावयाला
लीलागती विस्मरली सदाची,
अलक्तचिन्हें उठली पदाचीं
एकांत जों अंजन लोचनांत
घालूनि, घालूं म्हणते दुज्यांत,
तशीच तों धांवुनि ये गवाक्षीं
काडी करीं राहुनि कुड्मलाक्षी
कोणी गवाक्षीं निज दृष्टि फेंकी,
नावी त्वरेनें फिटली तिचे की,
हस्तें निर्या आकळुनीच ठाके,
नाभींत तत्कङ्कणकान्ति फाके
(वृत्त –इंद्रवंशा)
अन्या त्वरेंने उठली पहावया,
लागे पदांच्या स्खलनीं गळावया
ती ओविली जी पुरती न मेखला,
अंगुष्ठमूलीं गुणमात्र राहिला
(वृत्त-वसंततिलका)
लोलाक्ष हे भ्रमर ज्यावरि शोभतात,
आहेहि आसवसुवास भरून ज्यांत,
त्या त्यांचिया सुवनीं खिडक्या भरूनी
गेल्या-जणूं सचविल्याच सरोरुहांनी !
नोव्हेंबर १८८५
रघुवंशेश्रीकालिदास :
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १-२
----------------------------------------------------
२. उगवत असलेल्या सूर्यास
(वृत्त – मालिनी)
उदयगिरिशिरीं या त्वत्तुरंगी खुरांहीं
तुडवुनि उडवीली धूलि ही जैशि कांही !
द्युति बघुनि अशी ती चित्त माझें रमून,
दिनकर! मज बोधी तूज गाया नमून !
नव सुरुचिर वल्ली या हिमस्नात यांनी,
नव रुचिर लतांनी या हिमालंकृतांनीं,
स्मितसम सुमनांनी पूजितां तूज आतां,
फिरुनि फिरुनि भास्वन् ! वन्दितों तूज गातां.
कवळुनि करजालें भूमिलागूनि, लाल
विलसितरुचिभासें फेंकितां तूं गुलाल
विकसितततरुमालाकेशपंक्तींत तीचे,
स्तवुनि फिरुनि तूतें वन्दितों मी मरीचे !
अनुकरण करीं मी गाउनी या खगांचें,
तदिव सुमनतांचें वन्दुनी या लतांचें,
अनुसरत असें ही हांसुनी पद्मिनींस,
शरण तुजसि आलों मी असा नम्र दास !
डिसेंबर १८८५
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ३
----------------------------------------------------
३. मरणकाल
(याचे मूळ The Death Bed हे काव्य Thomas
Hood याने आपल्या एका बहिणीच्या
मरणसमयी लिहिले.)
( जाति – साकी )
आम्ही तीचें श्वसन रात्रभर सचिंत हो निरखियलें,
श्वसन तिचें मृदु मन्द जें अमुच्या कानीं पडलें –
अम्हां त्यामुळे, तीचे वक्षीं आयुष्याची लाट
हेलकावते खालवर, असें समजायाला वाट.
तेव्हां आम्ही कितीतरी पण हलक्यानें बोलावें,
सावकाशही तसें भोंवती फिरतांना चालावें !
जाणों तीचें लांबवावया आयुष्य अम्हीं आपुल्या
अर्ध्या किम्बहुना सगळ्याही शक्ति तिला अर्पियल्या.
अमुच्या आशांनी भीतीला खोटसाळ हो म्हटलें,
तसें आमच्या भीतींनींही आशांला ठरवियलें !
आम्हांला ती भासे मेली जेव्हां ती निजलेली,
आणि अहह ! निजलेली जेव्हां हाय! हाय! ती मेली.
कारण, नंतर पहाट आली अंधुक उदास तैशी
आणि हिमाच्या वर्षावाने काकडलेली ऐशी,
शिव ! शिव ! तेव्हां स्तब्धें पक्ष्में तिचीं सर्वथा मिटलीं,
- तिची आमुचीहुनी निराळिच पहाट तेव्हां झाली!
मार्च किंवा एप्रिल १८८६
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ४
----------------------------------------------------
४. प्रियेचें ध्यान
(वृत्त-शिखरिणी)
उद्यां प्रात:कालीं इथुनि मजला जाण निघणें
पुण्याला जाण्याला, स्वजन सगळा सोडुनि गडे;
उद्यां एव्हां माझ्याविण वद कसे होइल तुला?
दुणे तूझेवीणें श्रम सखि ! पर्थी होतिल मला !
असे मोठ्या कष्टें तुजजवळि मी पत्नी ! वदतां,
गळां तूझे माझे, मम तव, सखे ! हस्त असतां,
विशालाक्षी तुझे जल भरूनिया मी न दिसुनी,
वियोगाला भावी, समजलिस तूं भूत, चुकुनी !
निशीथीं या आतां असशिल मला ध्याउनि जसें
मदाभासा स्वांगीं विरहविकलीं वेष्टित, तसें –
मला शोकानें तूं समजुनि मदाभास दिधलें,
स्मरुनी तें आलिंगन, हृदय हें फारचि उलें !
गमें तूतें ध्याया मज न दुसरी आकृति बरी,
रतीचे वेळींच्या शिरती हृदयीं अन्यहि जरी;
म्हणूनियां वाटे मज अनुभवें याच सखये, -
सुखाहूनी दु:खा स्मरति बहुधा बद्ध हृदये !
अहा! अंकीं माझे तुज बघतसें मी बसलिस,
शिरा स्कन्धीं माझे लववुनि गडे तूं पडलिस,
वियोगाचे तर्के रडत असतां, अश्रु सुदती
तुझे, माझ्या वक्षीं टपटप बघें मी उतरती
टिपाया मी त्यांतें, पदर सरसावीं, परि गडे,
भिजोनी तो तुझें नयन सुकणें, हें नच घडे; -
असें कां व्हावें हें न कळुनि रडें मी खळाखळां,
पुसाया तैं लागे अहह ! नयनां तोच मजला !
मे १८८६
मासिक मनोरंजन, पहिले पुस्तक, वर्ष १ अंक ७,
नोव्हेंबर १८९५, पृ. ८४
'यथामूल आवृत्ती', १९६७, पु. ५
----------------------------------------------------
५. जरी तूं ह्या येथें असतिस सखे सौख्यद मला
( वृत्त – शिखरिणी)
जरी तूं ह्या येथें असतिस सखे सौख्यद मला,
तुझ्या तेथें वा मी जरिहि असतों लोलुप तुला,
तरी खासें झालें कितिक मजला सांग असतें? –
दुरावूं, अन्योंन्यां कवळुनि, दिलें आम्हिं नसतें.
त्वरेनें त्या क्रिडा मग उजळित्या या रजनितें,
-सरेना जी खेपा करित असतां मी इथतिथें,
- तुला वा मच्चित्रें क्षण दिसवुनी लाजवुनियां,
पुन्हां तीं झांकोनी, छल तव करी जी समयिं या.
‘प्रिये’ ‘कान्ते’ हीं मी मधुर अभिधानें मग किती
श्रुतिद्वारें चित्तीं तव दवडिलीं जाण असतीं !
न वा ऐसें. – तीं मी लिहुनि निजदन्तीं त्वदधरीं,
तुवां तीं वाचाया मुकुर धरितों मी तव करीं !
‘प्रिये’ ‘कान्ते’ ऐशा मधुर अभिधानांस अधुना
लिहावें मीं पत्रावर लकडिनें या अहह! ना?
परी तींही आतां अतितर सुटोनी थरथर
पुरीं हाताच्यानें नच करवती गे हरहर !
पुरीं हाताच्यानें नच करवतीं तीं प्रिय जरी,
न वा डोळ्यांच्यानीं क्षण बघवतीं तेंवि अपुरी;
पुसाया तीं इच्छीं परि कर धजेना म्हणुनियां
कराया सांगें तें स्वनयनजलांला रडुनियां !
१८८६
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १०
----------------------------------------------------
६. अपरकविता – दैवत
(वृत्त – शिखरिणी)
प्रिये, माझ्या उच्छुंखल करुनियां वृत्ति सगळ्या,
तुझ्या गे भासानें कवनरचनेला वळविल्या;
अशी जी तूं देशी प्रबलकवनस्फूर्ति मजशी,
न होशी ती माझे अपरकवितादैवत कशी?
बरें का हें वाटे तुज? – तुजवरी काव्य लिहुनी
रहस्यें फोडावीं सफल अपुलीं मीं मग जनीं ?
त्यजूनी ही इच्छा, मज सुखविण्या ये तर खरी, -
स्तनीं तूझे व्हावीं तर रचिन काव्यें स्वनखरीं!
रचायापूर्वी तीं, रसनिधि असे जो मम उरीं –
जयाच्या काव्यें या खचित असती फक्त लहरी,
तुला तो द्याया मी निधिच किती हा उत्सुक असें!-
करांनीं गे आकर्षुनि निधिस त्या घे तर कसें !
असा मी द्याया हें हृदय तुजला पत्नी सजलों,
पुन्हा कां तूं मातें तरि न दिसशी? – वा. समजलों !
पुण्यामध्यें ना मी, अहह ! बहरीं सोडुनि तुला
शिकायाला आलों ! तर मग तुझा दोष कसला ?
कुठें तूं ? – मी कोठें ? – जवळ असशी तूं कुठुनियां ! –
निवेदूं हें कैसें हृदय तुजला मी इथुनियां ?
तुझेवीणें तुझेवर मजसि काव्येंच लिहिणें ! –
उपायानें ऐशा मन वितहतापीं रमविणें.
विदेशी गे भुंगा प्रियकर कळीला स्मरुनि तो
स्वगुंजालापांला फिरुनि फिरुनी घेत असतो,
वियोगाची तेंवी करुनि कवनें हीं तुजवरी
तयांच्या आलापां, स्मरुनि तुज, मी सम्प्रति करीं. !
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १२
----------------------------------------------------
७. जयाजीराव शिंदे व तुकोजीराव होळकर
(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
ज्यांनी बाहुबले रणांत सगळे जिंकूनियां हो अरि
कीतींचे ध्वज आपुले उभविले या आर्यभूमीवरी,
त्यांचे पुत्र अम्हांस आज सहसा सोडूनिया चालतां.
खेदानें न रडे खरा कवण तो सांगा मराठा अतां?
राणोजी – परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
मल्हारी - परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
हा ! हा ! तत्कुलदीप हे विझुनियां गेले भले आज ना !
हा! हा! तत्कुलवृक्षगुच्छ बरवे कोमेजले आज ना!
जुलै १८८६
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ.६
----------------------------------------------------
८ अढळ सौन्दर्य
(जाति-दिंडी)
तोच उदयाला येत असे सूर्य
अहो क्षितिजावर त्याच नव्हे काय?
तेच त्याचे कर न का कुंकुमानें
वदन पूर्वेचें भरति संभ्रमानें ?
तेच तरु हे तैशाच पुष्पभारें
लवुनि गेले दिसतात पहा सारे !
त्याच वल्ली तैसेंच पुष्पहास्य
हसुनि आजहि वेधिती या मनास !
कालचे जे कीं तेच आज पक्षी
कालच्या हो ज्या त्याच आज वृक्षीं
बसुनि गाती कालचीं तींच गानें, -
गमे प्रात: प्रार्थना करिति तेणें !
काल जो का आनन्द मला झाला
तोच आजहि होतसे मन्मनाला;
कालचा जो मी तोच हा असें का? –
अशी सहजच उद्भवे मनीं शंका.
अशी सहजच उद्भवे मनीं शंका
काय समजुनि समजलें तुम्हांला का ?
असे अनुभव कीं – रिझवि एकदां जें
पुन्हा बहुधा नच रिझों त्याच चोजें.
पुन्हां बहुधा नच रिझों त्याच चोजें,
कसें मगं हें वेधिलें चित्त माझें –
आज फिरुनी या सूर्यतरुखगांनीं
आपुलीया नवकान्ति-पुष्प गानीं?
म्हणुनि कथितों नि:शंक ती तुम्हातें, -
असे सुन्दरता अढळ जरी कोठें
तरी करी ती सृष्टींत मात्र वास-
पहा, मोहिल सर्वदा ती तुम्हांस.
१८८६
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ११
----------------------------------------------------
९. सुष्टि आणि कवि
(वृत्त – शिखरिणी)
वयस्या, गाते ही मृदुधनरवें सृष्टि मधुर,
कसा गाऊं तीच्यापुढति वद मी पामर नर?
तशी ती गातांना श्रुतिसुमग ती पाक्षिकवनें
कशासाठी गावीं अरस कवनें मीं स्ववदनें?
मिषानें वृष्टीच्या खळखळ अशी सृष्टि रडतां
कुणाची ढाळाया धजल तसले अश्रु कविता ?
निशीथीं ती तैशी हळु मृदुमरुच्छ्वास करितां
कवीची गा कोण्या त्यजिल तसले श्वास दुहिता ?
ऑक्टोबर १८८६
'यथामूल आवृत्ती, १९६७, पृ.७
----------------------------------------------------
१०. दुर्मुखलेला
(वर्गात एका शिक्षकाने मला ‘दुर्मुखलेला’
म्हटले त्यावरुन माझ्या मनात आले.)
(वृत्त – शार्दूलविक्रीडीत)
माझें शुष्क खरेंच हें मुख गुरो ! आहे, तया पाहुनी
जाती प्रेक्षक सर्वही विरस ते चित्तामधीं होऊनी; -
हे सर्वां उघडे असूनि, वदुनी कां तें तुम्हीं दाविलें?
तेणें भूषण कोणतें मग तुम्हां संप्राप्त ते जाहलें ?
“याचें तोंड कुरुप हें विधिवशात् गाईल काव्यें नवीं,
तेणें सर्वहि डोलतील जन हे हर्षे कदाचित् भुवि !” –
विद्यासंस्कृत त्या तुझ्या, क्षणभरी, मस्तिष्कतन्तूंवरी
येता नम्र विचार हा तुज भला होता किती तो तरी!
जे मुंग्या म्हणुनी मनीं समजशी या मंडळीभीतरीं
हे पक्षी उडतील होउनि गुरो! व्योमीं न जाणों वरी !
राखेचीं ढिपळें म्हणोनि दिसती जीं, तीं उद्यां या जगा
भस्मीसात् करणार नाहिंत, अशी तुम्ही हमी द्याल का ?
माझ्या दुर्मुखल्या मुखामधुनि या, चालावयाच्या पुढें
आहे सुन्दर तो सदा सरसवाङ्निष्यन्द चोहींकडे !
तुम्ही नाहिं तरी सुतादि धातील तो प्राशुनी !
कोणीही पुसणार नाहीं, ‘कवि तो होता कसा आननीं?’
१८८६
करमणूक, ३ जानेवारी १८९१, पृ. ८३
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १३
----------------------------------------------------
११. कविता आणि कवि
(वृत्त-उपजाती)
अशी असावी कविता, फिरुन
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
अहांत मोठे? - पुसतों तुम्हांला
युवा जसा तो युवतीस मोहें
तसा कवी हा कवितेस पाहे;
तिला जसा तो करितो विनंति
तसा हिला हा करितो सुवृत्तीं.
लाडीगुडी चालव लाडकीशीं
अशा तर्हेने, जरि हें युव्याशीं
कोणी नसे सांगत, थोर गौरवें
कां ते तुम्ही सांगतसां कवीसवें ?
करुनियां काव्य जनांत आणणें,
न मु्ख्य हा हेतु तदीय मी म्हणें;
करुनि तें दंग मनांन गुंगणें,
तदीय हा सुन्दर हेतु मी म्हणें.
सभारुची पाहुनि, अल्प फार
रंगीं नटी नाचवि सूत्रधार;
त्याचें तयाला सुख काय होय ?
तें लोकनिन्दाभयही शिवाय!
नटीपरी त्या कविता तयाची
जनस्तुती जो हृदयांत याची :
पढीक तीचे परिसूनि बोल
तुम्ही कितीसे भुलुनी डुलाल ?
स्वभावभूयिष्ठ जिच्यांत माधुरी,
अशी तुम्हांला कविता रुचे जरी,
कवीस सोडा कवितेबरोबरी, -
न जाच वाटेस तयाचिया तरी.
तयाचिया हो खिडकीचिया, उगे,
खालीं, तुम्ही जाउनि हो रहा उभे; -
तिच्या तयाच्या मग गोड लीला
ऐकूनि, पावाल तुम्ही मुदाला !
३० डिसेंबर १८८६
करमणूक, १० जानेवारी १८९९, पृ. ९३
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ८-९
----------------------------------------------------
१२. बायांनी धरुनी बळें
(वृत्त – शार्दूलविक्रीडित )
बायांनी धरुनी बळें प्रथम जी खोलीमधें घातली,
लज्जा व्याकुळ होउनी रडत जी कोनीं उभी राहिली,
तीचे अश्रु अळेंबळें पुसुनियां कोणी प्रयत्ने तिला.
घेऊनी कडिये असेल शयनीं नेण्यास तो लागला !
‘ये आता जवळी!’ म्हणोनि चुटकी देतो बरें हा कधीं,
ऐशी उत्सुक होउनी, पदर तो घेऊनि ओठामधीं.
शय्येसन्निध नाथ पाहत उगी लाजेमुळें बैसली,
कोणाची असतील लोलनयनें तीचेवरी लोभली !
पानांच्या तबकांतुनी जवळच्या, ताम्बूल जो दीधला
कान्तेनें स्वकरें मुखांत दुरुनी, चावूनिं तो चांगला,
त्याचा भाग तिच्या मुखांत अपुल्या जिव्हेमुळें द्यावया,
कोणी घेत असेल पुष्टजघनी अंकावरी ती प्रिया !
लज्जा सोडुनि जी परन्तु विनयें अंकावरी बैसली,
हातांची रचिली तिनें पतिचिया कण्ठास हारावली,
तीचे उच्च कुचद्वया अपुलिया वक्षावरी दाबुनी,
कोणी पीत असेल ऐहिक सुधा वेगें तिला चुम्बुनी !
केव्हा दन्त मुखावरी, स्तनतटीं केव्हा नखें रोवुनी,
गाढलिंगन देउनी, निजकरें श्रोणी जरा, तिम्बुनी,
केव्हां अंगुलि त्या हळू फिरवूनी अंकी स्वकान्तेचिया,
कोणी यत्न असेल तो करित ती कामोद्धता व्हावया!
सान्निध्यांत पडो जराहि नच तें कान्तेचिया अन्तर,
यासाठी कचपाश सुंदर तिचा सोडूनियां सत्वर,
झाले केश सुरेख दीर्घ मग ते काळे तिचे मोकळे,
त्यांही घेत असेल कामुक कुणी बांधूनि दोन्ही गळे !
कामानें जळतो परन्तु विरहें होउनि मी विव्हळ;
आहेना तुजला असाच सखये! जाळीत हा गे खळ ?
कैशी होशिल शक्त या रजनिला कंठावया सम्प्रति !
माझीही छळणूक तो करितसे कंटाळवाणी अति !
पुणे, १८८७
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १६-१७
----------------------------------------------------
१३. स्फुट
(वृत्त – शार्दूलविक्रीडित)
हें हो चम्पकपुष्प रम्यहि जसें वर्णें सुगन्धें भलें,
ऐसें ऐसुनि कां बरें अलिवरें धिक्कारुनी त्यागिले? –
ही तों सत्य रसज्ञवृत्तिच असे, बाह्यांग त्या नावडे,
कौरुप्यींहि जरी वसे मधुरता तच्चित तेथें जडे!
(वृत्त-पंचचामर)
करी द्विरेफ पद्मिनीवरी विहार हो जरी,
वरीहि पुष्पवाटिका तशा रसालमंजरी,
करीरपुष्प शुष्कही रसार्थ चाखितो तरी,
वरी रसज्ञलोकवृत्ति सूचवी जनान्तरीं.
(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
या पुष्पावरुनी तयावरि असा अस्वस्थ गुंजस्वर
आलापीत फिरे, परी न रुचुनी ये तोंचि पद्मांवर,
त्यांते स्वाधिन जाणुनी करिशिरीं दानोदका पातला,
तो भुंगा विषयिस्थितीस करितो कीं व्यक्त वाटे मला!
(वृत्त-मंदाक्रांता)
जैसा तैसा नवयुवतिहृन्मन्दिरीं कामदेव
वागूं लागे, हळुहळु तसा हट्ट काठिन्यभाव –
दुरी सारी तिथुनि, मग ते राहण्याला स्तनांत
येती, अर्थात कुच तरिच हे पीन काठिन्ययुक्त !
(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
“ आहे येत शरांस फेंकित इथें धन्वी कुणी सत्वरी !
मित्रांनो ! जपुनी असा ! स्वहृदयें भेदूनि घ्या नातरी ! –“
झाले स्तब्ध असें जधीं परिसुनी ते सर्व भांबावुनी,
येतांना दिसली विलोलनयना त्यांना तधीं सरस्तनी !
(वृत्त-स्रग्धरा)
ऐन्यामध्ये महालीं निरखित असतां रुपशृंगार बाला,
आला मागूनि भर्ता, पुढति बघुनिया बिम्बयोगें तयाला,
बिम्बाच्या बिम्बभावा विसरुनि सरली लाजुनी त्या मागें,
कान्तें तों आयती ती कवळुनि हृदयी चुम्बिली गाढ वेगें!
(वृत्त – शिखरिणी)
घराला मी आलों अटन करुनी फार दिवशीं,
करांही कान्तेला हृदयिं धरिली मीं दृढ अशी;
तरी आश्लेषेच्छा पुरि न मम होवोनि म्हटलें –
‘विधीनें कां नाहीं मज कर बरें शंभर दिले?’
(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
अन्योन्यांप्रत चुम्बुनी कितिकदां जायापती रंगलीं,
मर्यादा मग चुम्बनास करणें ही गोष्ट त्यां मानली,
तैं दन्तक्षतसक्त तीनच पणीं लावोनियां चुम्बनें,
सारीपाट तयीं भला पसरिला क्रीडावयाकारणे !
कमलिनीची ब्रम्हदेवास प्रार्थना :-
(वृत्त –शिखरिणी)
रसज्ञांचा राजा मधुप दिसतो श्यामल जरी,
मला आहे भारी प्रिय, धवल तो हंस न तरी;
बिसें भक्षी, पद्में अरसिक सवें तो कुसमुडी,
विधें ! तद्धस्तीं मत्कमल कधिंही बा न दवडीं.
लाह्यांवर कूट :-
तप्त पात्रिं कलिकाचया गडे
टाकितां, सुमनियुक्त तें घडे;
ती फुलें फणिकरास अर्पिलीं,
शेष तीं त्वरित मींच भक्षिलीं !
(वृत्त-शिखरिणी)
अगा हंसा, चंचूमधिं विकसले पद्म धरुनी,
प्रमोदें डौलाने उडसिहि तसा नाचसि वनीं;
परी हास्यें कैसे विकल जन केले, बघ सख्या,
अली चैनींने त्वद्धत कमल सेवी म्हणुनियां !
(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
‘हे ग सुन्दरि पत्नी ! काय पदरीं तूं आणिलें झांकुनी?’
‘कोठे काय?’ म्हणूनि ती वदतसे वक्षाकडे लक्षुनी
‘ही हीं दोन फळे!’ म्हणूनि पदरा पाडूनि आलिंगुनी,
वक्षोजां कवळोनि तो पुसतसे ‘आले गडे का मनीं?’
(वृत्त –शिखरिणी)
हिमाद्रीचेमागें उदधिसम तें मानस दुरी,
तयामध्ये भृंगा ! विधिरथगण क्रीडन करी;
कुठे त्या ठायीचां तुज कमलिनीभोग मिळणे ?–
सरीं मार्गीच्या, त्या त्युजनि अभिलाषा, विहरणें !
(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
दृष्टीला दुरुनी गुलाब अमुच्या आकर्षितो लौकरी
जातां सन्निध त्याचिया रुतति तो कांटेहि अस्मत्करीं;
लोकीं रम्य तशीं सुखें झडकरी आम्हांस आकर्षिती,
भोगायास तयांस हो बिलगतां दु:खें अम्हां झोंबती.
(वृत्त-शार्दुलविक्रीडित)
रात्री ते सुरतप्रबन्ध सुचुनी अभ्यासकाली बरे,
लागा पुस्तक हो तुम्ही वरिवरी चाळावयाला करें,
तों होवोनि जिन्यांत छुमछुम असा आवाज त्याच्या भयें
हस्तांतूनि सवेंचि पुस्तक गळो मेजावरी तें स्वयें !
पांथोक्ति – प्रत्युक्ति
(वृत्त-स्रग्धरा)
“कोणाची गे वनश्री नयनसुखद ही?” “मत्पतीची असे हे.”
“कां ऐशी शुष्क शोभाविरहित?” “अपरासक्त तो फार आहे.”
“त्यक्ता तापें जरी ही कुश परि रिझवी चित्त माझें स्वभावें.”
“ऐसें हो का जरि, त्वां तरि रसिकवरा ! स्वस्थ चित्तें रमावें !”
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ६९-७२
----------------------------------------------------
१४. नाही ज्यापरि डोंगळा कधिंहि तो गेला झणी साखरे
(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
नाही ज्यापरि डोंगळा कधिंहि तो गेला झणीं साखरे,
नाहीं ज्यापरि चालला कधिंहि तो मार्जार साईकडे,
नाहीं कृष्ण कधींहि ज्यापरि सखे गेला दह्यांडीप्रत,
तैसा येइन मी समुत्सुक गडे तूझ्याकडे चालत!
भिक्षूनें निजदक्षिणा नच कधीं स्वीकारिली जेंवि की,
तत्पानें नच ज्यापरी धरियली गंगाजळी हस्तकीं,
हंसानें बिसिनी जशी व धरिली चंचूपटीं आदरें,
तैशी घेइन मी तुला निजकरीं तारे ! त्वरेनें बरें !
जैशी ती मलयानिलें न वनिका केव्हांहि आलिंगिली,
नाहीं ज्यापरि पर्वती कधिंहि ती धाराधरें वेष्टिली,
जैशी इन्द्रधनुष्करें उड्डुपथें मेघालि नाश्लेषिली,
आलिंगीन तशी तुला दृढ उरीं गे मंजुळे ! चांगली.
मद्यासक्त नरें जशी नच कधीं कान्ते ! कुपी झोंकिली,
भृंगानें अथवा जशी कमलिनी नाहीं कधी चोखिली,
राहूनेंहि न सेविली सखि ! सुधाधारा जशी सत्वर,
तैशी सेविन गोड ओष्ठवटिका तूझी गडे ! सुन्दर.
- 'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १५
----------------------------------------------------
१५. एका भारतीयाचे उद्धार
(वृत्त-मंदाक्रांता)
संध्याकाळी बघुनि सगळी कान्ति ती पश्चिमेला
वाटे सद्य: स्थितिच अपुली मूर्त ती मन्मनाला,
हा ! हा! श्रीचा दिवस अपुल्या मावळोनी प्रतीचे
गेला ! गेला ! सहज पडती शब्द हे मन्मुखाचे.
तेणें माथें फिरुनि सगळे जें म्हणोनी दिसावें,
त्या त्या मध्यें स्वजनकुदशा वाचुनी मी रडावें !–
‘जें जें चित्तीं बहुतकरुनी तें सुषुप्तींत भासे’
वृद्धांचे हें अनवितथ हो वाक्य होईल कैसें ?
प्रात:कालीं रवि वरिवरी पाहुनी चालतांना,
होई मोदातिशय बहुधा सर्वदा या जनांना;
पूर्वीची तो स्थिति परि करी व्यक्त ती वाचुनीयां,
एकाएकीं हृदय मम हें जातसें भंगुनीयां –
‘हा जैसा का रवि चढतसे त्याप्रमाणेंच मागें
स्वोत्कर्षाचा रविहि नव्हता वाढता काय? – सांगें;
जावोनी तो परि इथुनियां पश्चिमेंशीं रमाया,
र्हासाची ही निबिड रजनी पातली ना छळाया !’
वल्लींनो ! ही सुबक सुमनें काय आम्हांस होत ?
युष्मद्भानें मधुर, खग हो ! या जना काय होत ?–
आम्हां डोळे नसति बघण्या पारतंत्र्यामुळें हो !
ऐकायाला श्रुतिहि नसती पारतंत्र्यामुळें हो !
आहे आम्हांवर जंव निशा पारतंत्र्यांधकारें,
वाहे जों का उलट कुदशेचें तसें फार वारें,
सौख्याचें तोंवरि फुकट तें नांव व्हावें कशाला ? -
दु:खाचा तोंवरि खचित तो भोग आहे अम्हांला !
आनन्दाचे समयिं मजला पारतंत्र्य स्मरुन
वाट जैसें असुख, तितुके अन्य वेळी गमें न !
पाहोनीयां विष जरि गमे उग्र तें आणणांते,
अन्नामध्यें शतपट गमे उग्रसे पाहुनी तें !
‘देवा! केव्हां परवशपणाची निशा ही सरून
स्वातंत्र्याचा द्युमणि उदया यावयाचा फिरुन?
केव्हां आम्ही सुटुनि सहसा पंजरांतूनि, देवा,
राष्ट्रत्वाला फिरुन अमुचा देश येईल केव्हां?
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १४
----------------------------------------------------
Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:19pm 0 Comments 0 Likes
Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:18pm 0 Comments 0 Likes
Posted by Hemshila maheshwari on September 12, 2023 at 10:31am 0 Comments 1 Like
Posted by Pooja Yadav shawak on July 31, 2021 at 10:01am 0 Comments 1 Like
Posted by Jasmine Singh on July 15, 2021 at 6:25pm 0 Comments 1 Like
Posted by Pooja Yadav shawak on July 6, 2021 at 12:15pm 1 Comment 2 Likes
Posted by Pooja Yadav shawak on June 25, 2021 at 10:04pm 0 Comments 3 Likes
Posted by Pooja Yadav shawak on March 24, 2021 at 1:54pm 1 Comment 1 Like
वो जो हँसते हुए दिखते है न लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है
पराये अहसासों को लफ़्ज देतें है
खुद के दर्द पर खामोश रहते है
जो पोछतें दूसरे के आँसू अक्सर
खुद अँधेरे में तकिये को भिगोते है
वो जो हँसते हुए दिखते है लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है
© 2024 Created by Facestorys.com Admin. Powered by
Badges | Report an Issue | Privacy Policy | Terms of Service
You need to be a member of Facestorys.com to add comments!
Join Facestorys.com